
मुंबईतील ६३ टक्के महिलांची हाडे कमकुवत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः मुंबईत ४० वर्षांवरील ६३ टक्के महिलांना ऑस्टियोपेनियाचा त्रास असल्याचे आढळून आले आहे. यात त्यांची हाडे कमकुवत असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कमकुवत हाडे असल्याने त्यांना हाडे फ्रॅक्चर होणे, कायमचे अपंगत्व आणि मृत्यूचा धोका होतो. अनेक महिलांना याची माहिती नसल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या परिस्थितीचा धोका आणि त्यांच्याशी संबंधित गुंतागुंत कमी करण्यासाठी लवकर निदान आणि प्रतिबंध करण्याच्या धोरणांसाठी हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे.
४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अनेक महिलांना पाठदुखी, सांधेदुखी इत्यादींची तक्रार कोणत्याही विशिष्ट इतिहासाशिवाय होत होती. यादरम्यान त्यांना ऑस्टिओपोरोसिस झाल्याचे निदान झाले. त्यामुळे, मुंबईतील नानावटी मॅक्स रुग्णालयाने नेमका प्रादुर्भाव तपासण्यासाठी अभ्यास करण्याचे ठरवले. वरिष्ठ डॉक्टर गायत्री देशपांडे आणि प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी जान्हवी लालचंदानी यांनी सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या १८ महिन्यांच्या कालावधीत ५०३४ हून अधिक रुग्णांच्या माहितीची तपासणी केली. दरम्यान, संशोधकांनी पूर्व-निदान केलेल्या ऑस्टियोपोरोसिस किंवा ऑस्टियोपेनिया असलेल्या महिलांसारख्या उच्च-जोखीम गटांना वगळले. तर, नुकताच कर्करोग झालेल्या किंवा फ्रॅक्चरचा पूर्व इतिहास असलेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांचा अभ्यास केला गेला.
५ पैकी ३ महिला ऑस्टियोपेनियाने ग्रस्त
उच्च जोखीम गटांना वगळून ४०-९५ वयोगटातील १,९२१ महिलांच्या डेटाचे विश्लेषण या अभ्यासात करण्यात आले. महिलांनी ड्युअल-एनर्जी एक्स-रे ॲब्सॉर्प्टिओमेट्री स्कॅन केले, जे हाडांची घनता मोजतात. या तपासणीत असे दिसून आले की मुंबईतील ४० वर्षांवरील ५ पैकी ३ महिलांना ऑस्टियोपेनियाचा त्रास आहे; तर ४ पैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस असल्याचे निदान झाले आहे.
पाचपैकी एका महिलेमध्ये मणक्याची तक्रार
पाच सहभागींपैकी एकाला मणक्याच्या भागात ऑस्टिओपोरोसिस असल्याचे निदान झाले. ज्यामुळे मणक्याचे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो; तसेच श्वासोच्छ्वासावर परिणाम होऊ शकतो. हाडे चांगली ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणेही महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तपासणी दरम्यान, ऑस्टियोपोरोसिस आणि इतर हाडांशी संबंधित रोगांच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी डॉक्टर रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाचे, जीवनशैलीचे घटक आणि कौटुंबिक इतिहासाचे मूल्यांकन करू शकतात. मूल्यमापनाच्या आधारे, डॉक्टर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स सारख्या प्रतिबंधात्मक उपायांची शिफारस करू शकतात.
डॉक्टर काय म्हणतात?
डॉ. गायत्री देशपांडे म्हणाल्या की, या अभ्यासामुळे भविष्यात अशा परिस्थितीला आळा घालण्यास मदत होईल. डॉ. दीपक पाटकर म्हणाले की, स्टिरॉइडचा वापर किंवा गैरवापर, दीर्घकाळ धूम्रपान, मद्यपान आणि खाण्याचे विकार हे किशोरवयीन आणि तरुण स्त्रियांमध्ये हाडांच्या ऱ्हासाची सर्वात सामान्य कारणे आहेत. अभ्यासाचे परिणाम लक्ष्यित स्क्रीनिंग आणि प्रतिबंधक धोरणांचे महत्त्व अधोरेखित करतात.
ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनिया म्हणजे काय?
ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनिया कमी हाडांच्या घनतेची स्थिती दर्शवतात. ज्यामुळे फ्रॅक्चर, तीव्र वेदना आणि गतिशीलता कमी होण्याचा धोका वाढू शकतो. ऑस्टियोपोरोसिसमध्ये, हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात, ज्यामुळे ते तुटण्याची शक्यता वाढते. ऑस्टियोपेनिया हा हाडांच्या कमकुवतपणाचा एक सौम्य प्रकार आहे ज्यावर उपचार न केल्यास ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो.