
वडाळा येथील आरसीएम प्रकल्पाला नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वडाळा भक्ती पार्क येथे एका बांधकाम कंपनीच्या रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पाचा परवाना संपूनदेखील प्रकल्प अवैधपणे सुरू आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेने अशोका बिल्डकॉन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रकल्पाचे काम त्वरित बंद करा; अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेने नोटिशीतून दिला आहे.
पालिकेने तात्पुरत्या आरएमसी बॅचिंग प्लांटला तीन वर्षांच्या एकूण कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी नूतनीकरण करण्याच्या अटीवर परवानगी दिली होती. २०१९ मध्ये पालिकेने सहा महिन्यांसाठी पुनर्प्रमाणित केले आहे. त्यानंतर पालिकेने तात्पुरत्या आरएमसी बॅचिंग प्लांटसाठी कोणतीही परवानगी जारी केलेली नाही. त्यामुळे वैध परवानगी अस्तित्वात नसल्यामुळे पालिकेच्या एम पश्चिम विभागाने कारवाईचे निर्देश दिले आहेत.
आरएमसी प्लांट सुरू असताना कंपनीने आसपास अवैध बांधकाम सुरू केले. त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे पालिकेने आरएमसीसाठी दिलेली परवानगी रद्द केली. याबाबत एम पश्चिम विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त विश्वास मोते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
अवैध प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी तर झाली आहेच; शिवाय सरकारचा कोटी रुपयांचा महसूलही बुडाला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी होऊन कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
- संतोष दौंडकर, तक्रारदार