राज्यात शालेय शिक्षणाची अवस्था दयनीय

राज्यात शालेय शिक्षणाची अवस्था दयनीय

मुंबई, ता. १२ : राज्यात शालेय शिक्षणाची दयनीय अवस्था नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या विविध कामकाजातील माहितीवरून समोर आली आहे. २०१९-२० या कालावधीत शालेय शिक्षण विभागाच्या खर्चात सर्वात मोठी घट झाली असून ती ४ हजार ८९ कोटी ५५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. ही एकूण खर्चातील तब्बल ८.५० टक्के इतकी घट असल्याचे समर्थन संस्थेने केलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे.

राज्यात २०१९-२० मध्ये प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ६४३ प्राथमिक शाळांना २०२१-२२ पर्यंत टाळे लागले. त्यामुळे २ लाख ७० हजार विद्यार्थी शिक्षणाच्या परिघाच्या बाहेर फेकले गेले असल्याची धक्कादायक माहितीही समर्थनने दिली आहे. इयत्ता ९ वी ते १० वीमधील १०.८१ टक्के मुलांची, तर १०.६१ टक्के मुलींची गळती झाली असून ही गंभीर बाब असल्याचे समर्थनचे शिक्षण प्रमुख रूपेश कीर यांनी सांगितले. राज्यातील शाळांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाच राज्यातील १ लाख ५ हजार ८४८ शाळांपैकी ३ हजार ९१६ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत. दुसरीकडे अध्ययन क्षमतेतही अजून म्हणावी तशी प्रगती होत नसल्याचे समोर आले आहे.
--
विद्यापीठांची भरमसाठ वाढ
राज्यात मागेल त्याला खासगी विद्यापीठाचे धोरण राबवले जात असल्याने विद्यापीठांची संख्या कमालीची वाढत आहे. वर्ष २०१९-२० मध्ये राज्यात ६५ विद्यापीठे होती, त्यात वर्ष २०२०-२१ मध्ये ६ ची भर पडली. आता विद्यापीठांची एकूण संख्या ७१ झाली आहे, तर वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ४९४ महाविद्यालये होती. त्यामध्ये वर्ष २०२०-२१ मध्ये ३८ ने वाढ झाली असून राज्यातील महाविद्यालयांची संख्या ४ हजार ५३२ झाली आहे.
--
असे आहेत इतर निष्कर्ष
- पाचवीतील भाषा १७ टक्के, गणित ३० टक्के तर परिसर विज्ञान २९ टक्के विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा स्तर मूलभूतपेक्षाही कमी.
- आठवीतील भाषा १६ टक्के, गणित २७ टक्के, विज्ञान ३८ टक्के, तर सामाजिक शास्त्र ३५ टक्के विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा स्तर मूलभूतपेक्षाही कमी.
- दहावीतील आधुनिक भारतीय भाषा ४६ टक्के, इंग्रजी ४१ टक्के, गणित ३३ टक्के, विज्ञान ७७ टक्के तर सामाजिक शास्त्र ५८ टक्के विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा स्तर मूलभूतपेक्षाही कमी.
- वर्ष २०१९-२० मध्ये सर्व शाळांमध्ये १ कोटी ५६ लाख ९० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. वर्ष २०२१-२२ मध्ये यात २ लाख ७० हजारांनी घट झाली.
- याच दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांच्या संख्येत ५१९ ने वाढ झाली असून राज्यात ही संख्या २८ हजार ६१२ इतकी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com