
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईत आजही सर्वोच्च विक्रमी कमाल तापमानाची नोंद झाली असून सांताक्रूझ ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सांताक्रूझच्या तुलनेत कुलाबा येथे ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या मोसमातील हे विक्रमी तापमान नोंदवले गेले.
मुंबईत शनिवारी (ता. ११) मुंबई शहरातील कमाल तापमानात ६.५ अंश सेल्सिअस आणि उपनगरात ६.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली. संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी मुंबई उपनगरात सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई शहर ३७.४; तर उपनगरे ३८.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आजही (ता. १२) कमाल तापमानात ०.९ अंशाने वाढ झाली. आज सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३९.४; तर कुलाबा येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वाढत्या तापमानसह आर्द्रताही अधिक जाणवली. कुलाबा ७६; तर सांताक्रूझ ५४ टक्के आर्द्रता नोंदली गेली. यामुळे दिवसभर गरम झळा असह्य करत होत्या. वाढत्या आर्द्रता आणि तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेची जाणीव झाली. मुंबईतील तापमान वाढत असताना विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हरभरा, गहू पक्व अवस्थेत असलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात पावसाचा अंदाज
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापासून (ता. १३) पावसाची शक्यता आहे. हे वातावरण १७ मार्चपर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.