
मुश्रीफ पुन्हा न्यायालयात
मुंबई, ता. १३ : उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) धाडी टाकल्या जात आहेत. याबाबत मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा तातडीने न्यायालयात याचिका केली. याचिकेवर उद्या (ता. १४) सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुश्रीफ यांनी यापूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर मागील आठवड्यात सुनावणी झाली; मात्र तरीही त्यांच्या कारखाने आणि मालमत्तेवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. तसेच आज त्यांना चौकशीला हजर राहण्याचेही समन्स ईडीने बजावले होते.
मुश्रीफ यांच्या दोन कारखान्यांचे उत्पादन अधिक नसूनही त्यांच्या कारखान्यात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. मुश्रीफ यांची मुले आबिद, नावेद आणि साजिद या कारखान्यात भागधारक आहेत. ईडीने मुश्रीफ यांच्यावर गैरप्रकार आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. राजकीय हेतूने भारतीय जनता पक्षाकडून मला आणि कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. माझी राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी याचिकेत केला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या वारंवार याबाबत जाहीर आरोप करतात. त्यामुळे ईडीने दाखल केलेला गुन्हा आणि तपास अहवाल रद्दबातल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.