विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात लवकरच बैठक

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात लवकरच बैठक

मुंबई, ता. १३ : मुंबई विद्यापीठामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले जात असले, तरी त्यांना इतर भत्ते आणि सुविधा देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. १३) विधान परिषदेत दिले.
विधान परिषदेमध्ये पदवीधर आमदार विलास पोतनीस, आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या उत्तरात सांगितले, की मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जावे याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील किमान वेतन देण्याबाबत अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यांना किमान वेतन दिले जात आहे. या कर्मचाऱ्यांना वेतनाबरोबरच इतर आर्थिक लाभ दिले जावेत या उपप्रश्नाबाबत अधिक माहिती देताना मंत्री पाटील म्हणाले, की हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना विद्यापीठामार्फत वेतन दिले जाते. तथापि, याबाबत विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच याबाबत शहानिशा करून त्यानुसार आवश्यक सूचना दिल्या जातील.
मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२२ पासून किमान वेतन श्रेणीनुसार मूळ वेतन दिले जात आहे, तसेच या कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीनुसार मूळ वेतन देण्याची कार्यवाही विद्यापीठाकडून केली जात असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी दिली.
दरम्यान, मुंबई विद्यापीठामध्ये असलेल्या कंत्राटी, हंगामी सुरक्षा रक्षकांनाही वेतनश्रेणीनुसार मूळ वेतन अदा करण्यात येत आहे; तर सुरक्षा रक्षक मंडळामार्फत नियुक्त सुरक्षा रक्षकांना संबंधित मंडळाने ठरवलेल्या वेतन व भत्त्यानुसार वेतन अदा करण्यात येत असल्याची माहितीही पाटील यांनी या वेळी दिली.
--
असे आहेत कंत्राटी कर्मचारी
मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये सध्या ९२५ कंत्राटी कर्मचारी कार्यालयात आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी ही संख्या १ हजार २०० च्या दरम्यान होती. या कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे; तर काहींनी ती सोडून दिली असल्याने ही संख्या कमी झाली आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com