
केंद्रातील मोदी सरकार बरखास्त करा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ‘अदाणी स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीतील पैसा लुटत होता, त्यावेळी चौकीदार काय करत होते, मोदी सरकार जास्त काळ सत्तेवर राहिले तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल. म्हणून मोदी सरकार बरखास्त करा,’ अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अदाणी महाघोटाळ्याची चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेसने देशभरातील राज भवनावर आज धडक मोर्चा काढला. महाराष्ट्रातही महाघोटाळ्यांविरोधात पटोले यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते राज भवन मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी खासदार संजय निरूपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशीष दुआ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी ‘ये रिश्ता क्या कहेलाता है, मोदी-अदाणी भाई भाई, देश बेचके खाई मलाई, पहले राज था गोरों का, अब है चोरों का’, अशा आशयाच्या घोषणा आणि फलक झळकावण्यात आले.
वरिष्ठ नेत्यांची भाषणे झाल्यानंतर सर्व नेत्यांनी राज भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने त्यांनी या नेत्यांना अडवले. मात्र नेत्यांनी पोलिसांशी हुज्जत करत राज भवनकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
देशातील लोकशाही, संविधान वाचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे भाजप सरकारचे लक्ष नाही, जनतेला जगणे कठीण झाले आहे. अदाणी घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी काँग्रेसने केली, पण मोदी सरकार त्यावर गप्प आहे. मोदी सरकार अदाणी घोटाळ्याची चौकशीच करत नाही.
- बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते, काँग्रेस
अदाणींच्या घोटाळ्याविरोधात देशात प्रथम खासदार राहुल गांधी यांनी आवाज उठवला, पण मोदी सरकार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांना संसदेत बोलू देत नाही. आम्ही देशातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे आहोत म्हणून जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.
- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री