पालिकेची उद्याने, मैदाने उशिरापर्यंत राहणार खुली

पालिकेची उद्याने, मैदाने उशिरापर्यंत राहणार खुली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : शहरातील महापालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने नागरिकांसाठी अधिक काळ खुली ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आता दर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत असे एकूण १५ तास ती नागरिकांना खुली राहतील. शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत एकूण सलग १७ तास उद्याने व मैदानांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच सदर उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महापालिकेची उद्याने व मैदाने ही सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असतात. तेथे येणाऱ्या आबालवृद्धांची संख्या लक्षात घेता विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरूक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीत जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली असावीत, असा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी घेतला.
...
महानगरात एकूण २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. या सर्व ठिकाणच्या वेळा वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक
...
बदल फलकावर दर्शवणार
वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहायक आयुक्त न्याय्य कारणास्तव संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करू शकणार आहेत. उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने नागरिकांना खुली असण्याच्या वेळेतील बदल दर्शवणारे फलक दर्शनी भागावर लावले जातील. याशिवाय नागरिकांच्या माहितीसाठी बदललेल्या वेळा या महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com