अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार 
प्रकरणात रमेश कदम यांना सशर्त जामीन

अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात रमेश कदम यांना सशर्त जामीन

मुंबई, ता. १६ : अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांना तब्बल आठ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला; मात्र अन्य प्रकरणात आरोपी असल्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकणार नाही.
महामंडळ आर्थिक घोटाळ्यात कदम प्रमुख आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदावर असताना बनावट लाभार्थी दाखवून कदम यांनी हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहारात कदम यांना ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. महामंडळात सुमारे अडीचशे कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे लाचलुचपत विभागासह सर्व विभागांना दिल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला होता. बेकायदा भरती प्रक्रिया करणे, बोगस कर्ज देणे, निवडणुकीत पैसे वाटणे आदी आरोप कदम यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणी मागील आठ वर्षे ते कारागृहात होते. आतापर्यंत अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या दरम्यान अनेकदा गैरवर्तनामुळेदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. जामीन मिळाल्यावर तपासात सहकार्य करावे आणि मुंबई, ठाण्याबाहेर जाऊ नये, अशा शर्ती न्यायालयाने घातल्या आहेत.
दरम्यान, कारागृहात मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये प्रकरणात कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते. यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यात ते दोषमुक्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com