
बेल्जियमच्या नागरिकाला पासपोर्ट देण्यास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : बेल्जियम देशाचे नागरिकत्व असूनही भारतीय पारपत्रावर (पासपोर्ट) जगभर फिरणाऱ्या परदेशी नागरिकाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. विक्रम शहा असे या नागरिकाचे नाव आहे. केंद्र सरकारने याचिकादार शहा यांना भारतीय व्हिसा देण्यास नकार दिला होता. या निर्णयाविरोधात शहा यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.
सरकारने मला भारतीय व्हिसा मंजूर करावा किंवा भारतातील परदेशी नागरिक म्हणून नागरिकत्व द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती; मात्र शहा बेल्जियम देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे पारपत्र घ्यावे, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली. शहा जाणीवपूर्वक भारतीय पारपत्र मिळवून जगभर फिरत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य केला आणि दिलासा देण्यास नकार दिला. याचिकादार भारतीय नागरिक नाही. त्यामुळे त्यांना पारपत्र नाकारून कोणत्याही मूलभूत अधिकाराचा भंग होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. शहा यांनी गैरप्रकारे भारतीय पारपत्र वापरून यापूर्वी जगभर प्रवास केला आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.