गुंतवणुकीसाठी भारताला पसंती

गुंतवणुकीसाठी भारताला पसंती

मुंबई, ता. १७ ः गुंतवणुकीसाठी व त्यावरील चांगल्या परताव्यासाठी आता चीनपेक्षा भारताला पसंती मिळत आहे. येत्या सहा वर्षांत भारतात सरकारी व खासगी कंपन्यांतर्फे सात लाख कोटी डॉलरची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असल्याचे मत डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजरच्या डीएसपी नेत्र अहवालात वर्तवण्यात आले आहे.

आतापर्यंत चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. मात्र, तेथील उद्योगांच्या नफ्याबाबत अनिश्चितता असल्यामुळे आता त्याला भारताची स्पर्धा सुरू झाली आहे. वाहनांसाठी चीन आणि अमेरिका ही मोठी बाजारपेठ आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत तेथील विक्रीत आणि खपात फारशी वाढ झालेली नाही, असेही अहवालात दाखवून देण्यात आले आहे. भारतात मुक्त बाजारव्यवस्था आणि नफ्यावर आधारित उद्योगव्यवस्था आहे. त्यामुळे भारत हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय म्हणून उदयास आला असून त्यांनी गुंतवणूकदारांना आतापर्यंत चांगला परतावा मिळवून दिला आहे. गेल्या नऊ वर्षांत भारतात सरकारी व खासगी मिळून सात लाख कोटी डॉलरची गुंतवणूक झाली. आता येत्या सहा वर्षांतच एवढीच गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या गुंतवणुकीमुळे कंपन्यांच्या भांडवली खर्चातही मोठी वाढ होईल. मागील वर्षात भारतीय कंपन्यांच्या नफ्यात विक्रमी वाढ झाल्यामुळे, तसेच कर्जे कमी झाल्यामुळे कंपन्यांच्या भांडवली खर्चात वाढ होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी तेलाच्या किमती वाढत्या असल्यामुळे भारताची व्यापारातील तूटही वाढली होती. मात्र, आता तेलाच्या किमती स्थिर होत असल्याने, तसेच भारताच्या सेवा क्षेत्राची निर्यात वाढत असल्यामुळे भारताच्या चालू खात्यावरील दडपण कमी होईल. त्यामुळे या वर्षांत रुपयालाही त्याचा फायदा होईल. या सर्व कारणांमुळे भारतात शेअर तसेच अन्य मालमत्तांच्या मूल्यांकनाकडे लक्ष दिले पाहिजे. बाजार घसरेल तेव्हा आणि शेअरचे भाव योग्य किमतीला येतील तेव्हा गुंतवणूकदारांनी खरेदी केली पाहिजे, असेही अहवालात सुचवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com