‘दिव्य दरबार’विरोधातील याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दिव्य दरबार’विरोधातील याचिका फेटाळली
‘दिव्य दरबार’विरोधातील याचिका फेटाळली

‘दिव्य दरबार’विरोधातील याचिका फेटाळली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : मिरा रोड येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित ‘दिव्य दरबार’विरोधात मुंबई उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका नामंजूर केली.

ॲड. नितीन सातपुते यांनी शनिवारी (ता. १८) उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. ‘महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि बुवाबाजी तथा अंधश्रद्धा यांच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम करण्यासाठी मनाई करावी’ अशी मागणी करण्यात आली होती. तसेच शास्त्री यांच्या दरबारात ‘काळी जादू’ आणि ‘मंत्र तंत्र’ केले जातात, असा आरोप याचिकेत केला आहे. काळी जादू प्रतिबंध कायद्याचा दाखला याचिकेत देण्यात आला असून, अशा प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देणाऱ्या राज्य सरकारवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

दोन दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे, शांतता ठेवणे आदी शर्ती यामध्ये आहेत. सरकारकडून याची माहिती आज देण्यात आली. याची दखल घेत न्यायालयाने ॲड. सातपुते यांची याचिका फेटाळून लावली. शास्त्री यांचे नियोजित कार्यक्रम होऊ नयेत म्हणून स्थानिक राजकीय पक्षांनीदेखील विविध भूमिका मांडल्या आहेत. यापूर्वी शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.