
प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरेंचे केंद्राला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वाढत्या वायुप्रदूषणाचा मुद्दा केंद्र सरकारकडे उपस्थित केला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन मंत्री भूपिंदर यादव यांना पत्र लिहून त्यांनी मुंबईत बेफाम वाढलेले बांधकाम प्रकल्प आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही सक्षम यंत्रणा नसल्याकडे लक्ष वेधले. जी-२० च्या बैठका शहरात होत असल्याच्या निमित्ताने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत राजकीय मतभेद नको, असेही ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष देण्याची केंद्र सरकारला विनंती केली. अशा परिस्थितीत राज्याला स्वतंत्र पर्यावरण मंत्री नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक्यूआय घसरत चालला आहे. मुंबईत सर्वत्र बांधकामे सुरू असून त्यातून धूळ, कचरा निर्माण होत आहे; मात्र त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुंबईतल्या वाढत्या बांधकामाचा एकत्रित परिणाम शहराच्या पर्यावरणावर होत आहे. नगरविकास मंत्रालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे समजून घ्यायला पाहिजे. ‘सफर’च्या आकडेवारीनुसार शनिवारी मुंबईचा एक्यूआय १५९ वर गेला आहे. शहरातील रिफायनरी, फर्टिलायझर प्रकल्पांचे काम दिवस-रात्र सुरू असते. हवेच्या गुणवत्तेवर त्याचा थेट परिणाम होतो. माहुल आणि वडाळा भागातील नागरिकांना याची झळ पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने या प्रकल्पांचा आढावा घेऊन हे प्रकल्प शहराबाहेर हलवायला पाहिजेत, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
-----------
‘आरे’चाही उल्लेख
हवामान बदल विशेष सेल स्थापन करण्याचे पालिकेला निर्देश देण्यात यावेत. याशिवाय मोबाईल सेन्सॉर ठिकठिकाणी बसवावेत. ही यंत्रणा सर्वत्र बसवण्यात आलेली नाही. सध्याचे सरकार शहरातील हिरव्या जागा कमी करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. मुंबईकरांच्या इच्छेविरुद्ध आरे जंगलाबद्दल तडजोड केली गेल्याचा मुद्दाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.