आयआयटीचा अहवाल हा केवळ धूळफेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटीचा अहवाल हा केवळ धूळफेक
आयआयटीचा अहवाल हा केवळ धूळफेक

आयआयटीचा अहवाल हा केवळ धूळफेक

sakal_logo
By

किकर - दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण
---
मुंबई, ता. १९ : जातीय भेदभावामुळे आयआयटी मुंबईत दर्शन सोळंकी या प्रथम वर्ष अभियांत्रितीच्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली. तरीही आयआयटीतील प्रा. नंदकिशोर समितीच्या अंतरिम अहवालात अनेक गोष्टी लपवण्यात आल्या आहेत. हा अहवाल केवळ धूळफेक असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना आणि दर्शनच्या पालकांनी केला आहे.
प्रा. नंदकिशोर यांच्यासह १२ सदस्यांच्या तपास समितीने दर्शन सोळंकीच्या आत्महत्या प्रकरणावर आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या भेटी घेऊन चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर केला; मात्र हा अहवाल केवळ धूळफेक आहे. दर्शनने आत्महत्येपूर्वी आई-वडिलांना फोन केला होता, त्याचा संदर्भ या अहवालात कुठेही घेण्यात आला नाही. शिवाय चौकशीसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या ते दबावाखाली कसे सत्य सांगतील, असा सवालही या अहवालावर उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे आयआयटीने या प्रकरणाच्या चौकशी समितीमध्ये संस्थेबाहेरील म्हणजेच न्यायाधीश वा मानवाधिकार क्षेत्रातील कुठलीही तज्ज्ञ व्यक्ती नव्हती. त्यामुळे हा अहवाल तथ्यहीन असल्याची टीका
आंबेडकर पेरियर स्टडी सर्कलसह राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली. तसेच दर्शनच्या शवविच्छेदनावेळी त्याच्या पालकांशी संपर्क का साधण्यात आला नाही, असा सवाल महाराष्ट्र स्टुडन्ट्स युनियनचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी उपस्थित केला. आयआयटीने नेमलेली समिती ही बेकायदा असून या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
---
समितीत अनुभवी व्यक्ती हव्यात
दर्शन सोळंकीच्या आत्महत्येपूर्वी आयआयटी मुंबई येथे अनिकेत अंभोरे या विद्यार्थ्यानेही जातीय भेदभावातून आत्महत्या केली होती. दर्शनप्रमाणे त्या वेळीही असाच निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायव्यवस्था, प्रशासन आणि अनुभवी व्यक्तींची समिती नेमावी, अशी मागणीही अनिकेतचे वडील संजय अंभोरे यांनी केली आहे.
---
अहवाल वरकरणी
दर्शन सोळंकीच्या मृत्यूबाबत अंतरिम अहवाल हा आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कलला ई-मेलद्वारे प्राप्त झाला. त्यावर त्यांनी आक्षेप घेतले आहेत. या अहवालात दर्शन सोळंकीचा केवळ ‘डी एस’ असा दोन अक्षरी उल्लेख म्हणजे आयआयटी प्रशासन किती उथळ आणि वरवर चौकशी करते हे लक्षात येते. त्यामुळेच या अहवालातून कोणत्याही प्रकारचे वास्तव समोर न आणता ते लपवण्यात आले असल्याची टीका आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कलने केली आहे.