नव्या शैक्षणिक धोरणासह डिजिटल विद्यापीठावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या शैक्षणिक धोरणासह 
डिजिटल विद्यापीठावर भर
नव्या शैक्षणिक धोरणासह डिजिटल विद्यापीठावर भर

नव्या शैक्षणिक धोरणासह डिजिटल विद्यापीठावर भर

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : सहा महिन्यापासून अधिक काळ प्रभारी कारभारावर सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठाचा २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा एकूण ८११ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज अधिसभेत मंजूर करण्यात आला. प्रभारी कुलगुरू प्रा. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत वित्त व लेखा अधिकारी प्रदीप कामथेकर यांनी हा अर्थसंकल्प मांडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, भारतीय ज्ञान प्रणाली, डिजीटल विद्यापीठ, सौर उर्जा आणि हरित हायड्रोजन आदी प्रमुख विषयांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला.
जवळपास तीन तास चाललेल्या अधिसभेत अर्थसंकल्पावर फारशी चर्चा झाली नाही. त्यामुळे दुपारचे सत्र सुरू होण्यापूर्वीच गुंडाळले गेले. अर्थसंकल्पात विविध नाविण्यपूर्ण योजना आणि अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देण्यात आला असल्याचे प्रभारी कुलगुरु प्रा. डी.टी. शिर्के यांनी सांगितले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड उपास्थित होते.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी, भारतीय ज्ञान प्रणाली, डिजीटल विद्यापीठ, सुरक्षा पायाभूत सुविधा, प्रख्यात विद्याशाखा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने इंटर्न्स आणि अप्रेंटिसशिप, संशोधन सल्लागार समिती, सौर उर्जा आणि हरित हायड्रोजन, संशोधन विकास कक्ष, रँकिंग आणि ब्रँडिंग उपक्रम, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे लिंकेजेस, भरड धान्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणे, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, नवीन इमारतींसह जुन्या इमारतींची दुरुस्ती, विद्यार्थी हेल्प डेस्क आणि सिंगल विंडो, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र या अशा नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच हिंदी व उर्दू भाषा भवन- डीपीडीसी, तृतीय व चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल व सामुदायिक सभागृह, प्रा. बाळ आपटे दालन, स्कूल ऑफ लॅंग्वेजेस इमारत (२ रा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, वेंगुर्ला उपपरिसराचा विकास यासाठी भरीव आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
---
नियोजित बांधकामे
- तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह - १३ कोटी
- प्रा. बाळ आपटे दालन - १० कोटी
- स्कूल ऑफ लॅंग्वेजेस इमारत (दुसरा टप्पा) - ५ कोटी
-आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (दुसरा टप्पा) - १५ कोटी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र - २५ कोटी
- वेंगुर्ला उपपरिसराचा विकास- १० लाख