मध्य मुंबईच्या पूरमुक्तीचा संकल्प!

मध्य मुंबईच्या पूरमुक्तीचा संकल्प!

मुंबई, ता. २० : पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा सर्वाधिक फटका मध्य मुंबईला बसतो. तेथील पूरमुक्तीसाठी परळ, दादर, माटुंगा आणि सायन भागातील पर्जन्यवाहिन्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या कामासाठी ४४ कोटी ३५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मुंबई महापालिकेने ‘पूरमुक्त मुंबई’चा संकल्प केला आहे. त्या अंतर्गत पाणी भरणाऱ्या परिसराचे सर्वेक्षण करून तेथे उपाययोजना केल्या जात आहेत.

परळ, दादर, माटुंगा आणि सायन भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. दोन-तीन फूट पाणी तुंबून अनेकदा जनजीवन विस्कळीत होते. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तुंबणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी पालिका दरवर्षी पावसाळ्यात करोडो रुपये खर्च करते. त्यात नालेसफाईसाठी सर्वाधिक खर्च करण्यात येतो. पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपही बसवावे लागतात. त्यावर मात करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबईत गेल्या वर्षी ३८६ पूरप्रवण क्षेत्रे आढळून आली. त्यांपैकी २७५ पेक्षा जास्त क्षेत्रांमधे उपाययोजना करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यांपैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. सरकारी व खासगी जमिनीवर ४३ पूरप्रवण क्षेत्रे असून त्यांचे नियोजन शासकीय प्राधिकरण आणि खासगी जमीनमालक यांच्या समन्वयाने करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पर्जन्यवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.

नवीन वाहिन्या टाकणार
- परळ, दादर, माटुंगा आणि वरळी परिसरातील विविध भागांमधील सध्याच्या पर्जन्यवाहिन्यांचे रुंदीकरण करण्यासह आवश्यक असेल त्या ठिकाणी नवीन वाहिनी टाकण्यात येणार आहे.
- १९९३ च्या ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार पर्जन्य जलवाहिन्या प्रणालीची सुधारणा सुरू आहे.
- आराखड्यामधील शिफारशींनुसार ५८ कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. त्यांपैकी ४२ कामे पूर्ण झाली असून १३ प्रगतिपथावर आहेत. ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com