
संप मिटल्याने उत्तरपत्रिका तपासणी गतिमान
मुंबई, ता. २० : जुन्या पेन्शन योजनेसाठी सात दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप आज सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी मागे घेतला. त्यामुळे उद्यापासून (ता. २१) दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम फास्टट्रॅकवर केले जाणार आहे. दरम्यान, आज संप मागे घेतल्याचे जाहीर होताच अनेक शिक्षकांनी पेपर तपासणीला सुरुवातही केली असल्याची माहिती शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली, तर दुसरीकडे संपामुळे बंद असलेली शाळा, कनिष्ठ महाविद्यालये उद्यापासून नियमित सुरु होणार आहेत.
संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालय मागील सात दिवसांपासून बंद होते. त्यामुळे येथील अनेक प्रस्ताव, धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी रखडली होती. आता संप मिटल्याने शिक्षण विभागाच्या कार्यालयात पुढील काही दिवस मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपामुळे दहावीच्या ७० लाख, तर बारावीच्या २० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना शिक्षण मंडळात पडून आहेत. आता संप मिटल्याने त्या तातडीने तपासण्यासाठी शिक्षक कामाला लागणार आहेत. त्यासाठी सर्व काम वेळेत केले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी सांगितले. तसेच उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षक परिषदेच्या सर्व शिक्षक प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या असून प्रसंगी अधिक वेळ देण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
--
देवदर्शनाला गेलेल्या शिक्षकांची अडचण
बेमुदत संप असल्याने अनेक शिक्षक शिर्डी, शेगांव, कोल्हापूरसह तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले आहेत; मात्र आज संप मिटल्याने त्यांना तातडीने शाळांवर उपस्थित राहणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी किंवा गावी गेलेल्या शिक्षकांना उद्या लगेच शाळेत हजर राहण्यास अडचण होणार आहे.