
रुग्णसेवा होणार पूर्ववत
मुंबई, ता. २० : जुन्या पेन्शन योजनेसाठी पुकारलेला संप मागे घेतल्याने मुंबईसह राज्यभरातील रुग्णसेवा पूर्ववत होणार आहे. सोमवारी रात्रीपासूनच अनेक परिचारिका रात्रपाळीसाठी रुजू झाल्या आहेत. त्यामुळे या संपामुळे विस्कळित झालेली रुग्णसेवा पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, सात दिवसांच्या संपकाळात रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला. सोमवारीही बऱ्याचशा ओपीडींवर शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. सेंट जॉर्ज रुग्णालयातील ‘थॅलेसेमिया’ रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. डॉक्टर्स आणि काही तांत्रिकांच्या मदतीने रुग्णांना रक्त चढवले जात होते. इतर वेळी जवळपास दहा रुग्णांना रक्त चढवण्याची प्रक्रिया होते. यासह फक्त आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांनाच उपचार दिले जायचे; आता ही सर्व परिस्थिती पुन्हा पूर्ववत होऊ शकते, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.