
तीव्र लक्षणे असल्यास इन्फ्लुएन्झा चाचणी करा!
मुंबई, ता. २० : मुंबईत कोरोनासह इन्फ्लुएन्झाचा धोका वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेनेही नियमावली जारी केल्या आहेत. सर्दी, ताप, अंगदुखी, धाप लागणे, छातीत दुखणे, हायपरटेन्शन, नखांचा रंग निळसर होणे तसेच मुलांमध्ये चिडचिड होणे अशी लक्षणे असल्यास इन्फ्लुएन्झा चाचणी करावी, असे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले. कोरोना पूर्ण आटोक्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच देशभरात ‘इन्फ्लुएन्झा’मुळे चिंता वाढली आहे. यातच ‘एच१एन१’ स्वाइन फ्ल्यू आणि काही राज्यांमध्ये कोरोनाही वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये तीव्र लक्षणे असल्यास इन्फ्लुएन्झा चाचणी करावी असे निर्देश पालिकेने सरकारी-खासगी रुग्णालयांना दिले आहेत.