
वांद्रेत तातडीने स्कायवॉक उभारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : वाढती गर्दी आणि अपुऱ्या पदपथांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वांद्रे पूर्वेत एक स्कायवॉक तातडीने बांधण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. अपुऱ्या आणि असुरक्षित पदपथांमुळे जर एखादी दुर्घटना घडली, तर ती नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करणारी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
उच्च न्यायालयाचे माजी कर्मचारी के. पी. पी. नायर यांनी न्यायालयात याचिका केली आहे. वांद्रे येथे पूल उपलब्ध नसल्यामुळे पदपथावरून ये-जा करताना पादचाऱ्यांना जिकिरीचे होते. यामध्ये दुर्घटना होण्याचीदेखील भीती वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडापर्यंत पूल असायला हवा, असेदेखील याचिकेत म्हटले आहे. यावर पादचाऱ्यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी पूल उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने सांगितले. महापालिका आणि अन्य प्रशासनाने याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.