
नवीन भायखळा पुलामुळे कोंडीत भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका भायखळ्यामध्ये नवीन पूल उभारत आहे; मात्र हा पूल भायखळा सिग्नलच्या पुढे न जाता रेल्वे क्वार्टर्सजवळील रस्त्यावर उतरत असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूल उभारण्याचा उद्देश असफल होण्याची भीती व्यक्त होत आहे.
नवीन भायखळा पूल दक्षिणेकडे (जेजे फ्लायओव्हरच्या दिशेने) बांधण्यात येत आहे. सध्या या पुलाचे बांधकाम वेगात करण्यात येत असून हा पूल रेल्वे क्वार्टर्सजवळील रस्त्यावर उतरतो. रेल्वे क्वार्टर्स काही अंतर पुढे दोन सिग्नल आहेत. त्यामुळे पुलाचा मार्ग सिग्नलपर्यंत वाढवणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने पुलावरून वेगात येणारी वाहतूक रेल्वे क्वार्टर्सजवळ उतरेल. मात्र समोरच सिग्नल असल्याने या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
याबाबत वाहतूकतज्ज्ञ, तसेच सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी पत्र लिहून पालिकेला काही सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी नव्याने बांधकाम सुरू असलेला भायखळा पूल पुढील दोन सिग्नल्सला मागे टाकून जेजे फ्लायओव्हरपर्यंत वाढवावा, असे सुचवले आहे. पुलाची मार्गिका सिग्नलपर्यंत वाढवल्यास विनाखंड प्रवास करता येणार आहे. यामुळे येथील दोन सिग्नलवर वाहतूक थांबणार नाही. यामुळे दोन सिग्नलवर होणारी कोंडी टाळता येईल. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येईल, असेही शेणॉय यांचे म्हणणे आहे.