
चिमुरडीला खासगी अवयवांबद्दल माहिती असणे अपेक्षित नाही!
मुंबई, ता. २४ : तीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या शरीराचे खासगी अवयव माहिती असणे अपेक्षित नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावलेली दहा वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
मुंबईमधील विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. भारती डांग्रे यांनी ही याचिका नामंजूर केली आहे. पीडित मुलगी साडेतीन वर्षांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे तिला तिच्या खासगी अवयवांची माहिती असणे अपेक्षित नाही. तिच्याबरोबर जे झाले, ते तिने निरागसपणे सांगितले. आरोपीच्या वर्तनामुळे तिला झालेला त्रास आणि वेदनादेखील तिने सांगितल्या. या घटनेचे गांभीर्य तिच्या निरागस मनाला आता कळणारे नाही, म्हणूनच ती वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी शांतपणे बोलत होती आणि आरोपीचा उल्लेखही स्पष्टपणे केला. यावरून आरोपीचे दोषित्व सिद्ध होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. तीन वर्षांच्या पीडितेशी बोलून खटला चालवणे हे कठीण काम आहे; मात्र पॉक्सो न्यायाधीशांनी ते कसबाने केले, असेही न्यायालयाने नमूद केले.
---
काय होते प्रकरण?
अभियोग पक्षाच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०१७ मध्ये ही घटना घडली होती. पीडित मुलगी शेजारच्या मुलाबरोबर खेळत असताना त्याच्या वडिलांनी तिच्याबरोबर घृणास्पद गैरवर्तन केले. पीडितेने घाबरून याची माहिती घरी सांगितल्यावर आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले.