सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

मुंबई, ता. २४ : लोकसभेत आज संमत झालेल्या वित्त विधेयकातील काही तरतुदी शेअर बाजाराला प्रतिकूल असल्यामुळे भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्रीचा मारा झाला आणि शेअर बाजार निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी अर्धा ते पाऊण टक्क्यांपर्यंत कोसळले. सेन्सेक्स ३९८.१८ अंश, तर निफ्टी १३१.८५ अंश घसरला.

काल सेन्सेक्सने अठ्ठावन्न हजारांचा स्तर खालच्या दिशेने तोडला होता. आज निफ्टीदेखील सतरा हजारांच्या खाली घसरला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५७,५२७.१० अंशांवर, तर निफ्टी १६,९४५.०५ अंशांवर स्थिरावला.

लोकसभेत आज संमत झालेल्या वित्त विधेयकात शेअर बाजारातील फ्युचर व ऑप्शन व्यवहारांवरचा सिक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स अर्थात एसटीटी वाढवण्यात आला. मात्र याबाबत नीट स्पष्टता नसल्याने बाजारात अजूनच गोंधळ उडाला, तर डेट म्युच्युअल फंडांचे इंडेक्सेशन फायदेही काढण्याचा प्रस्ताव त्यात असल्याने या तरतुदी बाजाराला प्रतिकूल मानल्या गेल्या, त्यामुळे बाजारात विक्रीचा मारा झाला.

देशांतर्गत वातावरण प्रतिकूल असताना भरीस भर म्हणून जागतिक वातावरणही फारसे अनुकूल नसल्याचा फटका भारतीय शेअर बाजारांना बसला. दिवसभर सेन्सेक्स-निफ्टी वर-खाली होत होते, मात्र दुपारनंतर युरोपीय शेअर बाजार तीन टक्क्यांपर्यंत तोटा दाखवत उघडल्याने शेवटच्या दोन तासांत भारतीय शेअर बाजारांमध्येही मोठी विक्री झाली.

आज सर्वच क्षेत्र तोट्यात होती, त्यातही बँका, धातूनिर्मिती कंपन्या, ऑईल अँड गॅस या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली. निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ४१ शेअरचे भाव घसरले, तसेच सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २४ शेअरचे भाव पडले.

निफ्टीच्या प्रमुख शेअरपैकी बजाज फिन्सर्व चार टक्के, तर बजाज फायनान्स, टाटा स्टील, हिंदाल्को, अदाणी पोर्ट तीन टक्क्यांच्या आसपास घसरले. निफ्टीमधील सिप्ला एक टक्के वाढला आणि कोटक बँक अर्धा टक्के वाढला. सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी हे शेअर दोन टक्के पडले; तर स्टेट बँक, एचसीएल टेक, महिंद्र आणि महिंद्र, मारुती, टायटन, ॲक्सिस बँक हे शेअर एक टक्क्याच्या आसपास पडले.

कोट
...........
देशी आणि जागतिक आर्थिक निरुत्साही वातावरणाचा फटका भारतीय शेअर बाजारांना बसला. करविषयक तरतुदी बाजारासाठी प्रतिकूल असल्याच्या समजामुळे आज विक्री झाली. आयटी क्षेत्राची वाढ मर्यादित राहील, या इशाऱ्यानंतरही आज भारतात आयटी क्षेत्रात मर्यादित विक्री झाली.
- विनोद नायर, जिओजित फायनान्स

रुपया २४ पैसे घसरला
.................................
भारतीय शेअर बाजारात परदेशी वित्त संस्थांनी केलेली जोरदार विक्री आणि मजबूत झालेला डॉलर यामुळे आज डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २४ पैशांनी घसरून ८२.४४ वर स्थिरावला. आज व्यवहारांना सुरुवात होताच रुपया कालच्या तुलनेत १२ पैसे घसरून ८२.३२ वर उघडला होता. व्यवहारादरम्यान त्याने ८२.२० असा उच्चांकी स्तर आणि ८४.४९ असा नीचांकी स्तर गाठला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com