बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाची झाली झीज

बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाची झाली झीज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंगाची झीज झाली असल्याचे आयआयटी मुंबई संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तीन शतके जुन्या शिवलिंगाला पाणी, फुले आणि फळे याशिवाय इतर वस्तू अर्पण करण्यावर फेब्रुवारीमध्ये घातलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तसेच शिवलिंगावर अभिषेक करण्याची वेळ सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालात मंदिरातील शिवलिंग तसेच गणेशमूर्ती यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असल्याचे नमूद केले आहे; मात्र दोन्ही मूर्तींना कोणत्याही प्रकारचे तडे गेले नसल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे.
मंदिर ट्रस्टला फेब्रुवारी महिन्यात मूर्तीमधील होत असलेले बदल लक्षात आले. त्यांनी शिवलिंग आणि मूर्तीचे निरीक्षण केले असता त्यांची झीज होत असल्याची चिन्हे दिसू लागली. हे लक्षात घेऊन दूध, व्यावसायिक चंदनाचे सार तसेच अत्तर किंवा सुगंधित द्रव यासारख्या पदार्थांना मूर्तीवर लावण्यास किंवा अर्पण करण्यास परवानगी नाकारण्यात आली. फळे, फुले आणि अभिषेकासाठी पाणी न वापरण्याचा निर्णयदेखील मंदिर प्रशासनाने त्या वेळी घेतला होता. यानंतर शिवलिंगाचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील कृती ठरवण्यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या अहवालात आयआयटीने शिवलिंग दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी मूर्तींना हानीकारक आणि परिणामकारक ठरणारे घटक असलेल्या काही गोष्टी बंद केल्या पाहिजेत असे म्हटले आहे. यामध्ये अभिषेकासाठी दुधाचा वापर तसेच रसायन मिश्रित पाण्याचा लेप यांचादेखील समावेश करण्यात आला.
...
तडे जाऊ नयेत म्हणून...
शिवलिंग हे ग्रॅनाईटचे बनलेले असल्याने आणि संगमरवरी मूर्ती असल्याने अम्लीय आणि खारट स्वरूपाच्या अर्पणांमुळे वेळोवेळी झीज होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. मुंबईच्या आर्द्रतेच्या पातळीमुळेदेखील मूर्तीवर परिणाम होत असून मूर्तीवरील सततच्या लेपामुळे त्यातील रसायने मूर्तीमध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे भविष्यात मूर्तीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com