
मुंबईसह राज्यात कोरोनाची घसरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईसह राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना गेल्या दोन दिवसांपासून दैनंदिन रुग्ण संख्येत काहीशी घट झाली आहे. सोमवारी (ता. २७) राज्यात २०५; तर मुंबईत ६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दररोज १० ते २० ने वाढ होणाऱ्या कोरोना बाधित रुग्ण संख्येत दोन दिवसांपासून घट होत आहे.
मुंबईसह राज्यात मार्च २०२० पासून थैमान घालणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारसह मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले होते; मात्र गेल्या महिनाभरापासून पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सोमवारी राज्यात २०५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ४२ हजार ५९ वर पोहोचली आहे; तर राज्यात कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृत्युदर १.८२ टक्के एवढा असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत सोमवारी ६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५६ हजार ४५० वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९,७४७ वर स्थिरावली आहे. दिवसभरात ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत हा संख्या ११ लाख ३६ हजार ११४ इतकी झाली आहे. मुंबईत सध्या ५८९ सक्रिय रुग्ण आहेत.