
रुग्णालयांमध्ये कोविड वार्ड सुरू
मुंबई, ता. २७ : मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा विशेष कोविड वॉर्ड सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्यात मुंबईत कोरोना रुग्णवाढीत तीन टक्क्यांनी वाढ झाल्याने राज्य सरकार, महापालिका तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोविडसमर्पित वॉर्ड सुरू करण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांसाठी महापालिकेचे सेव्हन हिल्स तसेच राज्य सरकारचे सेंट जॉर्ज रुग्णालय अद्यापही कोविडसमर्पित ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन तसेच इतरही बाबी सज्ज ठेवल्या आहेत. यापैकी सेव्हन हिल्स रुग्णालयात सध्या कोरोनाचे ३० रुग्ण दाखल असून त्यातील पाच जणांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत; मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोविड समर्पित वॉर्ड सुसज्ज ठेवण्यात आल्याचे डॉ. महारुद्र कुंभार यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातही औषधे, पीपीई किट तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचे जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही कोविड वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. लीलावती रुग्णालयानेही आयसीयूमध्ये १५ स्वतंत्र खाटांची व्यवस्था केल्याचे रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्ही. रवीशंकर यांनी सांगितले; तर बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. गौतम भन्साळी यांनीही कोविड रुग्णांसाठी १० खाटा राखीव ठेवण्यात आल्याचे नमूद केले.
--