
पानसरे हत्या प्रकरणात नवे धागेदोरे!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) दोन फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्याबाबत नवे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. तपास यंत्रणेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सीलबंद अहवालात याबाबत माहिती दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर आज न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
पानसरे हत्येचा तपास प्रारंभी एसआयटीमार्फत केला जात होता; मात्र कुटुंबीयांच्या विनंतीवरून आता एटीएसकडे तपास सुपूर्द करण्यात आला आहे. एटीएसच्या वतीने सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी आज न्यायालयात सीलबंद अहवाल सादर केला. या तपासात पवार आणि अकोलकर यांच्याबाबत काही तपशील मिळाल्याची माहिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान एसआयटीने यापूर्वीच्या तपासावर आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यामुळे न्यायालयाने यामध्ये देखरेख ठेवू नये, अशी मागणी आरोपी विक्रम भावे आणि शरद कळसकर यांनी याचिकेतून केली आहे. ही मागणी उच्च न्यायालयाने नामंजूर केली.
पानसरे यांच्या हत्येचा तपास नव्याने सुरू करणे आणि सुरू असलेला खटला या भिन्न गोष्टी आहेत. खटला सरू असून, यावर स्थगिती दिलेली नाही; तर एटीएस त्यापुढील तपास नव्याने करत आहे. त्यामुळे खटला पारदर्शकपणे चालविण्याची मागणी करण्याचा अधिकार आरोपींना आहे; पण पुढच्या तपासाला विरोध करण्याचा कायदेशीर अधिकार नाही, असे न्यायालयाने सुनावले आणि पुढील तपासावर देखरेख करणार असल्याचे स्पष्ट केले.
कटाचे सूत्रधार एकच!
२० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात सकाळच्या वेळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पानसरे, अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पद्धतीमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे कटाचे सूत्रधार एकच असल्याचा संशय आहे. त्यामुळे हा तपास एसआयटीऐवजी एटीएसमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी याचिकेत केली होती.