क्षमता नसतानाही महाविद्यालयात परीक्षा केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षमता नसतानाही महाविद्यालयात परीक्षा केंद्र
क्षमता नसतानाही महाविद्यालयात परीक्षा केंद्र

क्षमता नसतानाही महाविद्यालयात परीक्षा केंद्र

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : गोरेगाव येथील एका महाविद्यालयात ३०० विद्यार्थ्यांची क्षमता असताना त्या ठिकाणी २ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दिले आहे. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा मोठा बोजवारा उडणार असल्याने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी युवा सेनेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाची पदवीच्या वाणिज्य शाखेची अंतिम वर्ष सत्र- ६ परीक्षा येत्या ५ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यापीठाने गोरेगाव पश्चिमेतील जशभाई मगनभाई पटेल महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून दिले आहे. या महाविद्यालयात सुमारे ३०० विद्यार्थ्यांची क्षमता असताना येथे सत्र- ६ च्या परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. युवा सेनेच्या माजी सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर, प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासाठी विद्यापीठाचे प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तब्बल एक हजार ७०० विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आग्रह धरण्यात आल्यानंतर विद्यापीठाकडून त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रदीप सावंत यांनी दिली.

कुलपतींना लक्ष घालण्याची विनंती
परीक्षा केंद्र आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना सुमारे एक महिना आणि त्यादरम्यान दिली जाते; मात्र आता केवळ काही दिवसांचा कालावधी उरला असताना विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदली करावे लागणार असल्याने त्यांचे हॉलतिकीटही बदली होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमित होण्याची शक्यता आहे. यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ई-मेल, मोबाईलच्या माध्यमातून संदेश, माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच असे प्रकार पुन्हा घ‍डणार नाहीत यासाठी कुलपतींनीही याकडे लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.