
एलअँडटी सुफीनचा सामंजस्य करार
मुंबई, ता. २ ः एलअँडटीच्या सुफीनने क्रेडई एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेशी सामंजस्य करार केला आहे. महामुंबई क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना लागणाऱ्या साहित्याची खरेदी डिजिटल पद्धतीने करता यावी यासाठी हा करार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
एलअँडटी सुफीन ही औद्योगिक उत्पादनांची खरेदी-विक्री करण्यासाठी एलअँडटीने स्थापन केलेली डिजिटल व्यवस्था आहे. या करारामुळे क्रेडई-एमसीएचआयच्या सदस्यांना बांधकामासाठी लागणारे साहित्य एलअँडटी सुफीनमार्फत डिजिटल माध्यमातून खरेदी करता येईल. या माध्यमातून उच्च दर्जाचे आणि स्वस्त साहित्य सोयीस्करपणे घेता येईल. तसेच आवश्यकता असल्यास त्यासाठी अर्थसाह्यदेखील मिळू शकेल, असे एलअँडटीच्या एस. एन. सुब्रमण्यन यांनी सांगितले. एलअँडटी समूह बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असून तंत्रज्ञान क्षेत्रातही त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या भागीदारीचा फायदा सर्वांना होईल, असे क्रेडई एमसीएचआयचे अध्यक्ष बोमन इराणी म्हणाले. एलअँडटी सुफीनच्या माध्यमातून पन्नास वेगवेगळ्या प्रकारची तीन लाख उत्पादने पस्तीस हजार ग्राहकांना मिळतात.