
अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपये मानधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मानधनामध्ये वाढ करण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांनी वारंवार आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेऊन राज्य सरकारने १ एप्रिलपासून सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील २ लाख ७ हजार ९६१ मानधनी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्याकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यास अनुसरून मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना ७ हजार २०० आणि अंगणवाडी मदतनीसांना ५ हजार ५०० इतके मानधन मिळणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय २३ फेब्रुवारी २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात येणारी ही वाढ कायम ठेवण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही, असे परिपत्रक महिला व बाल विकास विभागातर्फे काढण्यात आले आहे.
हिस्सा ६०-४० टक्के
१) एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पांतर्गत ९७,४७५ अंगणवाडी सेविका; ९७, ४७५ मदतनीस व १३,०११ मिनी अंगणवाडी सेविका असे एकूण २,०७,९६१ मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत.
२) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्राचा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के हिस्सा असे प्रमाण आहे. याशिवाय राज्य सरकारकडून अतिरिक्त हिश्श्यातून मानधन देण्यात येते.