रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योजकांनी पुढाकार घ्यावा ः गोऱ्हे

रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योजकांनी पुढाकार घ्यावा ः गोऱ्हे

मुंबई, ता. २७ : राज्यातील युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी महाराष्ट्र आणि जपान व्यापाराला चालना दिली पाहिजे. युवकांना जपानी भाषा सहज शिकता आली पाहिजे, यासाठी विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे, असे मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

विधिमंडळ सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्याबाबत माहिती व प्रस्तावित प्रकल्पाबाबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी आज विधान भवनात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि उद्योजक यांची ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला आमदार मनीषा कायंदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी संचालक विपीन शर्मा, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, उद्योजक अनंत सिंघानिया, अजित मंगरूळकर, प्रदीप अहिरे, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, विधिमंडळ सदस्य यांचा नुकताच जपान दौरा पार पडला. या दौऱ्यामध्ये जपान येथील बाजारपेठ राज्यातील उद्योजकांकरिता, तसेच राज्यातील बाजारपेठ जपानच्या उद्योजकांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, त्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. राज्यातील उद्योजकांना जपानच्या ज्या भागात व्यावसायिक गुंतवणूक करायची आहे त्याकरिता लागणारी प्रशासकीय सहायता महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने करण्यात येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच आजची बैठक ही प्राथमिक स्वरूपाची आहे. येत्या जून महिन्यात विधान भवनात यासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात येईल. त्यावेळी राज्यात आणि जपानमध्ये व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांनी त्यासंदर्भातील योजनांचे आणि संभाव्य प्रकल्पांचे सादरीकरण या बैठकीमध्ये करावे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी उद्योजकांना सांगितले. तसेच जपान आणि महाराष्ट्राच्या उद्योजकता आणि इतर विषयांच्या अनुषंगाने प्रत्येक दोन महिन्यांनी बैठक घेण्याविषयी सूचित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com