मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : मुंबई आणि परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी त्याचा मुंबईला काहीही फायदा झालेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४.६७ टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत असल्याने आगामी काळात मुंबईकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे राहू शकते. यामुळे राज्य सरकारला विनंती करून अतिरिक्त पाणीसाठी मिळवण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.

मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार, तुळशी अशा विविध सात धरणे/तलावांतून पाणीपुरवठा होतो. पावसाला सुरुवात झाल्यानंतर आक्टोबर महिन्यात ही धरणे १०० टक्के भरतात. गेल्या वर्षी धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने ती तुडुंब भरली होती. त्यामुळे या वर्षी पाण्याचे संकट येणार नाही अशी आशा होती; मात्र पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. सध्या या सातही धरणांमध्ये केवळ २४.६७ टक्केच (३,५७,०४९ एमएलडी) पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी (१ मे २०२२) याच दिवशी २८.१० टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा ३.४३ टक्क्यांनी कमी असल्याने चिंता वाढली आहे.

मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो; तर दरवर्षी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. सध्याचा पाणीसाठा ३,५७,०४९ पर्यंत खाली आला आहे. हा पाणीसाठा साधारणतः तीन महिने पुरेल इतका आहे; मात्र पाऊस लांबला तर पाणीबाणीसदृश परिस्थिती ओढवण्याची भीती आहे.

नियोजन करावे लागणार
मुंबईमध्ये उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढतो. त्यातच उकाडा वाढल्याने मुंबईतील पाणीसाठा वेगाने संपत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी पुरवणे गरजेचे आहे. पावसाळा आणखी दोन महिन्यांवर असून पाणीसाठा कमी असल्याने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन पालिकेला करावे लागणार आहे. यासाठीच महापालिकेने राज्य सरकारला अतिरिक्त पाणीसाठा मिळावा यासाठी पत्र लिहून मागणी केल्याचे समजते.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा
अप्पर वैतरणा- ५३,८९९ (२३.४ टक्के)
मोडक सागर- ४१,८६६ (३२.४७ टक्के)
तानसा- ५३,२९२ (३६.७३ टक्के)
मध्य वैतरणा- २६,४२६ (१३.६५ टक्के)
भातसा- १,६७,५४१ (२३.३७ टक्के)
विहार- १०,७३३ (३८.७५ टक्के)
तुळसी- ३,२९२ (४०.४१ टक्के)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com