
भूमिगत ‘पे ॲण्ड पार्क’कडे वाहनचालकांची पाठ
मुंबई, ता. ४ : पालिकेने बऱ्याच ठिकाणी सशुल्क ‘पे ॲण्ड पार्क’ सुविधा उभारली आहे. मात्र, पैसे भरावे लागू नये म्हणून अनेक चालक ‘पे ॲण्ड पार्क’च्या बाहेरच वाहने उभी करत आहेत. परिणामी काही पार्किंग लॉटच्या बाहेर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. त्यावर उपाय म्हणून निःशुल्क पार्किंग सुविधा वाढवण्याची गरज असून त्यासाठी रेल्वेस्थानकांवर पार्किंगची चाचपणी करण्याची सूचना वाहतूकतज्ज्ञांनी केली आहे.
डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन, २०३४ च्या नियम ५३ खाली नमूद केल्याप्रमाणे भूमिगत पार्किंगची तरतूद करण्यात आली आहे. भूमिगत पार्किंगला विद्यमान किंवा प्रस्तावित डीपी रस्त्यांच्या खाली व क्रीडांगण, उद्यान आणि सार्वजनिक खुल्या जागा अशा आरक्षित जमिनीच्या खाली परवानगी दिली जाते. काही जागा त्याला अपवाद असून ओव्हल मैदान, क्रॉस मैदान, आझाद मैदान, शिवाजी पार्क, सर्व परेड मैदान, नरे पार्क, जांभोरी मैदान, फाईव्ह गार्डन आणि स्कॉटिश शाळेसमोरील मनोरंजन मैदान, दादर, कॅडेल रोड (वीर सावरकर मार्ग) इत्यादी ठिकाणांना पार्किंगच्या बांधकामापासून सूट देण्यात आली आहे.
शहरात पार्किंग धोरण असले, तरी त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही, असे वाहतूकतज्ज्ञ गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. सध्या वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून त्यावर पर्याय म्हणून राज्य सरकार आणि पालिकेने सध्याचा बेस्ट बस डेपो, एसटी आगार, दहिसर टोल नाका, मुलुंड, कोस्टल रोडला लागून असलेल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवर पार्किंगची जागा तयार करणे, असे पर्याय शोधायला हवेत, असेही ते म्हणाले. पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबई पोर्ट ट्रस्ट, गोदरेज, वाडिया ट्रस्ट इत्यादी ठिकाणी असलेल्या मालमत्तांचाही शोध घेण्याची गरज आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या रस्त्यांच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात कार आणि दुचाकी उभ्या केलेल्या दिसतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडथळे निर्माण होतात. आता यापुढे शहरातील प्रत्येक निवासी इमारतीला स्टिल्ट पार्किंग सक्तीचे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
कडक कारवाईची गरज
शहरातील विकसकांनी बांधलेले सध्याचे पार्किंग लॉट काही ठिकाणी आहेत. त्यांना ते बांधण्यासाठी अतिरिक्त एफएसआय मिळालेला आहे. मात्र, त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात नाही. के पूर्व प्रभागात पालिकेला वसंत ओॲसिस बिल्डिंग, टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग, मरोळ आणि सहार येथील टी २ टर्मिनलजवळ तीन पार्किंग लॉट देण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत नाही. पार्किंगच्या लॉटच्या बाहेरच अनेक वाहने रस्त्यावर उभी केलेली दिसतात. त्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असेही गॉडफ्रे पिमेंटा यांनी अधोरेखित केले.