गर्भवतींची जिल्ह्यातील रुग्णालयांत ‘एचपीएलसी’ तपासणी!

गर्भवतींची जिल्ह्यातील रुग्णालयांत ‘एचपीएलसी’ तपासणी!

जागतिक थॅलेसिमिया दिन


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : थॅलेसिमिया झालेल्या बालकाला दर वीस दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यामुळे थॅलेसिमियाग्रस्त पाल्याकरिता रक्त मिळविण्यासाठी पालकांना वणवण करावी लागते. परिणामी अनेक पालकांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून गर्भवती महिलांना स्त्री-रोग तज्ज्ञांनी थॅलेसिमियाची तपासणी करायला सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाले असून लवकरच जिल्ह्यातील रुग्णालयांत संस्थेला कंत्राट देऊन सर्व गर्भावतींची हाय परफॉर्मन्स लिक्विड प्रोमॅटोग्राफी (एचपीएलसी) तपासणी करण्यात येणार आहे. साहजिकच तीन महिन्यांत तपासणी झाल्यास गर्भधारणा रोखणे शक्य होणार आहे.

खासगी रुग्णालयात गर्भवतींची थॅलेसिमिया तपासणी होत असली, तरी अजूनही पालिका आणि शासकीय दवाखान्यात ती केली जात नाही. थॅलेसिमिया असलेल्या आई-वडिलांकडून मुलेही वाहक किंवा बाधित होऊ शकतात. लग्नापूर्वी त्याबाबतच्या तपासण्या न झाल्याने अनेकदा पती-पत्नी दोघेही थॅलेसिमियाचे वाहक निघतात. परिणामी बाळाला थॅलेसिमिया होण्याची शक्यता २५ टक्के होते. त्यामुळे सर्व गर्भवतींची तपासणी होण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या राज्यात ११ हजार थॅलेसिमियाचे रुग्ण असून त्यांना कार्ड देण्यात आले आहे. ते दाखविल्यास थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्तपेढ्यांनी मोफत रक्त देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

थॅलेसिमियाबाबत जनजागृती आणि तपासणी व्हावी म्हणून समृद्धी फाऊंडेशनने पुढाकार घेतला. त्यांनी अकोल्यासह बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत ‘एचपीएलसी’ तपासणी करण्यासाठी आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. त्यानंतर आता आयुक्तांनीही पाच जिल्ह्यांत सर्व गर्भवती महिलांची एचपीएलसी तपासणी करण्यासाठीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तिथे गर्भवतींच्या एचपीएलसी चाचणीला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडूनही सर्व जिल्ह्यांत एचपीएलसी चाचणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अजून त्याला मान्यता मिळालेली नसली, तरी काम लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर संस्थेला ते देण्यात येईल. रुग्णांसाठी तपासणी मोफत असेल, असे डॉ. महेंद्र केंद्रे यांनी सांगितले.

‘प्री नेटल चाचणी’चा सल्ला
पहिले बाळ थॅलेसिमियाग्रस्त असेल, तर दुसऱ्या वेळी गर्भवतीने प्री नेटल टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. बोरिवलीत महापालिकेच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये त्याबाबतची तपासणी मोफत होते. गर्भवती महिलेने अशी तपासणी तीन महिन्यांच्या आत केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसिमिया आहे की नाही, याचे निदान करता येते. थॅलेसिमिया असल्यास अशा महिलेची गर्भधारणा रोखता येते. वर्षाला १० ते १५ अशी प्रकरणे येत आहेत, असे डॉ. महेंद्र केंद्रे यांनी सांगितले. स्त्री-रोग तज्ज्ञांनी गर्भवतींना तीन महिन्यांच्या आत अन्य चाचण्यांसोबत ‘एचपीएलसी’ करण्याचा सल्ला द्यावा, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com