राजावाडी रुग्णालयात मिळणार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्त

राजावाडी रुग्णालयात मिळणार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्त

‘राजावाडी’त थॅलेसिमियाग्रस्त मुलांना रक्ताची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : जगभरात ८ मे रोजी थॅलेसेमिया दिन पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर थॅलेसेमियाग्रस्त आणि रक्त चढवण्याची गरज असलेल्या मुलांना आता पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात सेवा उपलब्ध होणार आहे. राजावाडी रुग्णालयात थॅलेसेमिया वॉर्ड आधीपासूनच होता. आता पालिकेने सुविधा वाढवल्याने तेथे ब्लड ट्रान्स्फ्युजन करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटकोपरबरोबरच परिसरातील थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर सायनऐवजी जवळच्या राजावाडीत उपचार करता येणार आहेत, अशी माहिती राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजुलवाला, बालरोगतज्ज्ञ डॉ. राधा बालाजी आणि थॅलेसेमिया वॉर्डचे डॉ. अमित व्हटकर यांनी दिली आहे.
डॉ. अमित म्हणाले, की आतापर्यंत घाटकोपर चेंबूर भागातील थॅलेसेमियाग्रस्त मुले सायन रुग्णालयात जात असत. या मुलांना आता मोठी मदत होणार आहे. राजावाडी रुग्णालयात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच रक्त देण्यास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी ब्लड बँक असल्याने रक्त उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यात आली. तसेच रुग्णांना लागणारी ल्युकोशिट फिल्टर सुविधा पालिका देणार आहे.

याही सेवा पुरवणार
बहुतांश वेळा रक्त शरीरात चढविल्यानंतर थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. अशा वेळी रुग्णांच्या शरीरात वाढलेले लोहप्रमाण कमी करण्यासाठी चिलेशिन औषधे द्यावी लागतात. ही औषधेदेखील पालिकाच पुरवणार आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना २१ ते २८ दिवसांच्या कालावधीत ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागते. अशा मुलांचे हिमोग्लोबिन साडेनऊ ते ११ च्या दरम्यान ठेवण्याची गरज असते. कमी झाल्यास त्यांच्या अशक्तपणा येतो. म्हणून महिन्याला रक्त चढवावेच लागणार आहे. याची नोंद ठेवण्यात येणार असून त्यांच्या निदानाच्या तपासण्या या ठिकाणीच होणार आहे. थॅलेसिमियावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे तंतोतंत उपाय आहे. मात्र ते बोरिवली येथील थॅलेसिमिया केंद्रात केले जाते. मात्र मिळताजुळता बोन मॅरो आढळल्यास तसेच गरज पडल्यास या मुलांना त्या केंद्रात पाठवले जाणार असल्याचे सागण्यात आले. काही विशिष्ट समाजातील व्यक्तींमध्ये थॅलेसिमियाचे प्रमाण अधिक आढळून आले. त्यामुळे घाटकोपर राजावाडी रुग्णालयात थॅलेसिमिया वॉर्ड सुरू करण्यात आला होता. आता मात्र डिएनबी टिचर डॉक्टर इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध केल्याने येथे उपचार होणार आहेत.

सुमारे ३० ते ४० मुले ब्लड ट्रान्स्फ्युजनसाठी नियमित येण्याचा अंदाज
रक्‍त चढवण्यासाठी या ठिकाणी आयसेलेशन रूम वापरण्यात येणार आहे. या भागातील मुले सायन रुग्णालयात जात असल्याने या भागातील २७ थॅलेसिमियाग्रस्त मुलांची यादी तयार केली आहे. यांना आता राजावाडी रुग्णालयात उपचार देण्यात येतील. सध्या चार मुले या ठिकाणी उपचारासाठी येणार आहेत. नियमित सुमारे ३० ते ४० मुले येतील, असा अंदाज राजावाडी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित व्हटकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com