
रेल्वेप्रवाशांवर दगडफेक करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांवर दगड आणि रॉड फेकून मारणाऱ्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने चार प्रकरणांत दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी राकेश रौड याच्यावर जुलै २०१९ मध्ये प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रौड याने एकूण तीन जणांना दगडफेक करून गंभीर जखमी केले होते. एका प्रवाशावर त्याने लोखंडी रॉड फेकल्याने त्याच्या डोक्याला इजा होऊन त्याला स्मृतिभ्रंश झाला होता. आरोपीला आपल्या वर्तनाची आणि त्यामुळे घडणाऱ्या परिणामांची पूर्ण जाणीव होती. दगडफेकीळे प्रवासी गंभीर जखमी होऊ शकतात आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, याचीही कल्पना होती. त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर सिद्ध होतो, असे निरीक्षण न्या. अभय जोगळेकर यांनी नोंदवले. आरोपीने कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान तीन जणांवर दगडफेक केली होती. कुर्ला स्थानकात एकावर लोखंडी रॉड फेकला होता. त्यात दोन युवकांना डोक्याला इजा होऊन टाके पडले होते. एकाला छातीमध्ये दुखापत झाली होती. घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.
अशा प्रकारे वर्तन करणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते, असा संदेश समाजात निर्माण व्हायला हवा. आरोपीने स्वत:चा बचाव करताना तो घरात एकटा कमावता आहे, असे सांगितले आहे. मात्र, त्याच्या गुन्ह्यामुळे अनेकांचे जीवन विस्कळित झाले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आरोपीला रेल्वे सुरक्षा कायद्याच्या अंतर्गतही शिक्षा सुनावण्यात आली आहे. रेल्वेला धोका पोहचवणे आणि प्रवाशांना इजा करणे, असा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला होता.
आरोपी मानसिकरीत्या ठीक!
माझी मानसिक अवस्था ठीक नाही. माझे एकाशी भांडण झाले होते आणि त्यातून मी हल्ला केला, असा बचाव आरोपीने केला होता. मात्र, त्याच्या वैद्यकीय चाचणीत तो मानसिकरीत्या ठीक असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने चाचणी अहवाल मान्य करून आरोपीचा युक्तिवाद नामंजूर केला. ॲड्. अभिजित गोंदवाल यांनी अभियोग पक्षाच्या वतीने बाजू मांडली.