कर्मचारी मानसिक समस्यांनी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी मानसिक समस्यांनी त्रस्त
कर्मचारी मानसिक समस्यांनी त्रस्त

कर्मचारी मानसिक समस्यांनी त्रस्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कोरोनाकाळानंतर मानसिक आरोग्य ही सर्वांत मोठी आरोग्य समस्या बनली आहे. या वेळेस मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा धोका समोर आला आहे. या सर्वेक्षणात ४८ टक्क्यांहून अधिक कर्मचारी मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक महिला त्रस्त आहेत.
आदित्य बिर्ला एज्युकेशनच्या उपक्रमाने एमपॉवर मानसिक आरोग्यासंबंधित ''मानसिक आरोग्य आणि निरोगीपणाचे गुणांक @ वर्कप्लेस'' या शीर्षकाखाली हे सर्वेक्षण केले आहे. एमपॉवरशी संबंधित मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सपना बांगर यांनी सांगितले, देशातील विविध उद्योग आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांची सर्वसमावेशक माहिती देणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, देशात काम करणाऱ्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपैकी जवळपास निम्म्या लोकांना मानसिक आरोग्याचा धोका आहे. त्यातही स्त्रियांचे प्रमाण फार आहे.
..........................
आठ शहरांमध्ये सर्वेक्षण
मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बेंगळुरू या आठ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण ई-कॉमर्स, आयटी, आरोग्य सेवा, बीपीओ इत्यादी १० क्षेत्रांतील तीन हजार कर्मचाऱ्यांवर करण्यात आले. या सर्वेक्षणात कॉर्पोरेट कंपन्यांच्या व्यवस्थापक स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
......
निष्कर्ष
* सर्वेक्षणात पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांना जास्त त्रास होतो.
* ५६ टक्के महिला कर्मचारी मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त
* ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना तणावाचा त्यांच्या कामावर परिणाम होतो.
* ई-कॉमर्स क्षेत्रातील ६४ टक्के कर्मचारी तीव्र मानसिक आरोग्याच्या धोक्यात अडकले आहेत.
* १० पैकी ९ कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे ठिकाण आणि घरातील कामांमध्ये बिघडलेले संतुलन आढळले.
...................................
काय करू शकता
* दैनंदिन कामासाठी डायरी बनवा.
* सकाळी लवकर उठून प्राणायाम करा. योगासने करा.
* अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका.
* कामाच्या ठिकाणी घरचा आणि घरी कामाचा विचार करणे टाळा. जेणेकरून तुम्ही एका वेळेस चांगले काम करू शकता.
* फार थकवा आला, तर शांत गाणी ऐका.
* सुदृढ आरोग्य जीवनशैली निवडा.
* स्क्रीनटाईम कमी करा.
* सातत्याने खुर्चीवर बसून काम करत असाल, तर ४५ मिनिटे स्वत:च्या शरीराला द्या.
.........................................

कामाबद्दलचा जर आनंद वाटला, तर काम अगदी सहजपणे होते. कामावरील नाती खेळकर आणि चांगली असतील, तर कार्यक्षमता चांगली राहते. ताण ओळखायला शिकल्यास त्यावर पर्यायाने मात करता येते. त्यासाठी योगा, प्राणायम, व्यायाम करू शकतो. इतर व्यसने टाळली पाहिजेत. व्यसनाने ताण आणखी वाढतो. कामावर शांत गाणी ऐकली, तरी ताण कमी होण्यास मदत होते.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचारतज्ज्ञ
................................................