गंभीर गुन्ह्यांतील ११६ अधिकारी ‘ऑनड्युटी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गंभीर गुन्ह्यांतील ११६ अधिकारी ‘ऑनड्युटी’
गंभीर गुन्ह्यांतील ११६ अधिकारी ‘ऑनड्युटी’

गंभीर गुन्ह्यांतील ११६ अधिकारी ‘ऑनड्युटी’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये निलंबित असतानाही पालिकेने तब्बल ११६ अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतल्याचे उघड झाले आहे. ‘कोविड ड्युटी’च्या नावाखाली विविध खटल्यांचा सामना करणाऱ्या ११६ अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. बहुतांश अधिकारी प्रामुख्याने लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत.

कोविड काळात अत्यावश्यक सेवा म्हणून अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामावर घेण्यात आले. त्यात अनेक निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्याचदरम्यान पालिकेतील निलंबित अधिकाऱ्यांनाही कामावर घेण्यात आले. त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागातील ५३, शहर अभियंता विभागातील २३, पाणी, सुरक्षा आणि अग्निशमन विभागातील प्रत्येकी सहा, आरोग्य विभागातील १७ आणि तीन रुग्णालयांतील सहा अधिकाऱ्यांवर कोविडच्या काळात मेहेरनजर दाखवण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांबाबत माहिती अधिकारी जितेंद्र घाडगे यांनी पालिकेकडे विचारणा केली होती. त्यात त्यांना वरील माहिती मिळाली आहे. कोरोना महामारी आणि त्याबाबतची कर्तव्ये दोन वर्षांपूर्वीच संपली असतानाही संबंधित अधिकारी ‘कोविड ड्युटी’च्या नावाखाली काम करत आहेत. हे चिंताजनक आहे, असे जितेंद्र घाडगे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप होत असताना पालिका त्यांना संरक्षण देण्याचा आणि मागच्या दाराने प्रवेश देण्याचा प्रयत्न करताना पाहणे दुर्दैवी आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पालिकेने निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना आधीच अर्धा पगार दिला जात आहे. निलंबित अधिकाऱ्यांना अर्धा पगार देण्याऐवजी नवीन अधिकारी नियुक्त करावेत. जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. पालिकेने भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यापेक्षा प्रामाणिक आणि पात्र उमेदवारांच्या रोजगाराला प्राधान्य द्यावे.
- जितेंद्र घाडगे, प्रमुख, द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन