कारागृह रुग्णालयातील उपचारास वाझेचा नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृह रुग्णालयातील उपचारास वाझेचा नकार
कारागृह रुग्णालयातील उपचारास वाझेचा नकार

कारागृह रुग्णालयातील उपचारास वाझेचा नकार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : अँटिलिया स्फोटक प्रकरणात आरोपी असलेला बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेने कारागृहात असलेल्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे, अशी तक्रार विशेष न्यायालयात तळोजा कारागृह प्रशासनाने केली आहे. वाझे सध्या तळोजा कारागृहात आहे.

वाझेला मधुमेहाचा आजार आहे. त्याच्यावर बायपास शस्त्रक्रियाही झाली आहे. त्याला उलट्या होत असून ताप येत आहे. डॉक्टरांनी त्याला कारागृहात असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची सूचना केली आहे; मात्र वाझेने ती अमान्य केली असून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. त्याबाबत कारागृह प्रशासनाने न्यायालयाकडे तक्रार केली आहे. वाझेला कदाचित खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील, असेही अर्जात म्हटले आहे. वाझेच्या वतीने ॲड. रौनक नाईक यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. कोणतीही वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय वाझे रुग्णालयात दाखल होऊ शकत नाही. कारागृहात असलेल्या रुग्णालयाची अवस्था योग्य नाही. त्यामुळे तिथे प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो, असे नाईक यांनी न्यायालयात सांगितले.

जामिनाबाबत जूनमध्ये सुनावणी
सचिन वाझेने जामिनासाठी केलेल्या अर्जावर अद्याप एनआयएच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्याबाबत आता न्यायालयाने अखेरची संधी तपास यंत्रणेला दिली असून जूनमध्ये सुनावणी निश्चित केली आहे. तीन वर्षांपासून वाझे कारागृहात आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तो प्रमुख आरोपी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खटल्यात तो माफीचा साक्षीदार झाला आहे.