
महिलेचा हात जोडला, केईएम मध्ये डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
महिलेचा हात जोडण्यात केईएमचे अनेक हात एकवटले
केईएममध्ये डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : चपात्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोटी ग्रायंडर मशीनमध्ये अडकून मुलुंडमधील ४१ वर्षीय अस्मिता सातोपे या महिलेचा हात कापला गेला. या महिलेला मुलुंडच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करून कापलेल्या हातावर मलमपट्टी करून तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले गेले. महिलेवर तत्काळ प्लास्टिक सर्जरी विभागाच्या तज्ज्ञ टीमने ११ तासांच्या अथक शस्त्रक्रियेनंतर या महिलेचा कापलेला हात तिच्या हाताशी जोडला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी काही काळ या महिलेला डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात येईल, अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांनी दिली.
२ मे या दिवशी रोजच्या प्रमाणे मुलुंडमध्ये कामाला आलेल्या अस्मिता सातोपे यांचा पीठ मळण्याच्या यंत्रात हात अडकल्याने तो मनगटापासून वेगळा झाला. नंतर त्यांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत कापलेला हात बर्फात भरून त्यांना मुलुंडच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करून कापलेल्या हातावर मलमपट्टी करून तत्काळ केईएम रुग्णालयात दाखल केले.
असे झाले उपचार
केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणल्यानंतर तेथील प्लास्टिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी त्वरित या महिलेला दाखल करून घेतले.
महिलेवर तात्काळ प्लास्टिक सर्जरी विभागाच्या तज्ज्ञ टीमने शस्त्रक्रिया करण्याचे निर्णय घेतला.
तब्बल ११ तासांच्या अथक शस्त्रक्रियेनंतर या महिलेचा कापलेला हात तिच्या हाताशी जोडला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून जवळपास पुढचे काही आठवडे तरी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. तीन आठवड्यानंतर या रुग्णाच्या फिजिओथेरपीला सुरुवात होणार आहे.
हात मशीनच्या बाहेर खेचून काढल्याने हाताच्या अनेक नसांची जागा हलली आहे. मूळ जागा हलल्यानंतर ती पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागतो; तरीही या महिलेच्या हाताची हालचाल सुरू झाली आहे. प्रकृतीत बरीचशी सुधारणा होत आहे.
- डॉ. विनिता पुरी, प्लास्टिक सर्जरी विभागप्रमुख
अवयव तुटल्यास काय करावे?
डॉ. विनिता पुरी यांनी सांगितले की, ही शस्त्रक्रिया खूप अवघड होती. कारण शस्त्रक्रियेत मनगटाच्या दोन्ही रक्तवाहिन्या जोडणे खूप अवघड काम होते. त्या जोडण्याकरिता अनेक तास शस्त्रक्रिया करावी लागते. जेव्हा अशा पद्धतीने शरीराचा कोणताही भाग तुटतो, त्यावर प्लास्टिक सर्जरी हा उपाय जरी असला, तरी लोकांनी अशा प्रकारे काम करताना काळजी घेतली पाहिजे. या घटना टाळण्याजोग्या आहेत. असे काही घडलेच तर अवयव थेट बर्फात ठेवण्याची चूक करू नये. अवयव प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून त्यानंतर बर्फाच्या पेटीत ठेवणे गरजेचे आहे.