‘एल अँड टी’चा वार्षिक नफा दहा हजार कोटींवर

‘एल अँड टी’चा वार्षिक नफा दहा हजार कोटींवर

मुंबई, ता. ११ ः अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील कंपनी लार्सन अँड टुब्रोला मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १० हजार ४७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. या वर्षात त्यांना १ लाख ८३ हजार कोटी रुपये एकत्रित महसूल मिळाला असून तो मागील वर्षापेक्षा सतरा टक्के जास्त आहे. यातील आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मिळालेला महसूल ६८ हजार ७८७ कोटी रुपये आहे. संचालक मंडळाने भागधारकांना प्रतिशेअर २४ रुपये लाभांश घोषित केला आहे. कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या नफ्यापेक्षा २१ टक्के जास्त आहे.

कंपनीला या वर्षात दोन लाख तीस हजार कोटी रुपयांच्या कामांच्या ऑर्डर मिळाल्या. यात मागील वर्षीपेक्षा १९ टक्के वाढ झाली. या ऑर्डर सार्वजनिक कामे, भुयारे आणि बोगदे, पाटबंधारे, धातू निर्मिती, तेल व नैसर्गिक वायू, ऊर्जा वितरण आणि संरक्षण या सर्व कामांच्या आहेत. यातील आंतरराष्ट्रीय कामांच्या ऑर्डर ८६ हजार कोटी रुपयांच्या आहेत. या वर्षअखेर एल अँड टीकडे सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कामाच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

केंद्र सरकारच्या विविध उद्योगस्नेही उपाययोजना, तसेच पायाभूत सुविधांवर केलेला खर्च यामुळे देशाची आर्थिक वाढ वेगाने होत आहे. हा वेग असाच कायम राहील, अशी चिन्हे आहेत; तर सध्या जगभर आर्थिक अनिश्चितता असली, तरीही चीनची अर्थव्यवस्था खुली होत असून युरोपातील नैसर्गिक वायूचे संकटही शिथिल होत आहे; तर अमेरिकेतही ग्राहकांची मागणी वाढत असल्यामुळे हे अनिश्चिततेचे ढग कमी होतील अशी चिन्हे असल्याचेही कंपनीने वार्षिक आढाव्यात म्हटले आहे.
.........
कंपनीने वर्षभरात मिळवलेला महसूल गेल्या पाच वर्षातील सर्वोत्तम आहे. कमी महत्त्वाच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून ऊर्जा संक्रमण आणि तंत्रज्ञान विषयक व्यवसायावर भर दिला जाईल. त्याद्वारे जास्त महसूल निर्मिती करून भागधारकांना जास्त लाभांश दिला जाईल.
- एस. एन. सुब्रम्हण्यन, एमडी व सीईओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com