
न्यायालयात बनावट निकालपत्र दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : लघुवाद न्यायालयात असलेल्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे बनावट निकालपत्र दाखल केल्याच्या आरोपात तीन जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिले आहेत. वांद्रेमधील एका खासगी मालमत्तेच्या प्रकरणात २०१९ पासून लघुवाद न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणात न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
तक्रारदार असलेल्या तीन जणांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी काही कागदपत्रे दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यांच्या मालमत्तेबाबत केलेली एक याचिका नुकतीच फेटाळली आहे; मात्र काही दिवसांपूर्वी संबंधित अन्य प्रकरणात एका वकिलाला २०१८ मधील एक निकालपत्र व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाले. या निकालाची शहानिशा करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालय रजिस्ट्रार कार्यालयात चौकशी केली; मात्र अशाप्रकारे कोणतेही निकालपत्र त्या दिवशी झालेल्याची नोंद कार्यालयात नव्हती. त्यामुळे याची माहिती त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात केली.
न्या. माधव जामदार यांच्यापुढे यावर नुकतीच सुनावणी झाली. याबाबत पक्षकार एस. सचिन (नाव बदलले आहे) यांच्यासह अन्य दोघांची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या तिघांनी न्यायालयात संबंधित कागदपत्रे सादर केली, असे अर्जामध्ये म्हटले आहे. प्रथमदर्शनी आरोपात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केले आहे. यावर पुढील सुनावणी जूनमध्ये होणार आहे.