
Mumbai : १३ वर्षीय मुलगी डायलिसीसमुक्त; ब्रेनडेड मुलाची किडनी उपलब्ध
मुंबई - गेल्या तीन वर्षांपासून डायलिसिसवर असणाऱ्या ऐरोली येथील अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर कॅडेव्हरिक रेनल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. बाई जेरबाई वाडिया रुग्णालय फॉर चिल्ड्रेनमध्ये ही पहिली कॅडेव्हरिक किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
प्राध्यापक आणि युरोलॉजी सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा ब्रेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. उमा अली, पेडीयाट्रिक युरोलॉजी सर्जन आणि बाल नेफ्रोलॉजी केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.
ऐरोलीमध्ये राहणारी आर्या पाटील या मुलीचे ४ वर्षांपूर्वी मूत्रपिंड निकामी झाले होते. एक वर्ष विविध उपचार करूनही तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.
नंतर पुढे किडनी नैसर्गिकरीत्या कार्य करत नसल्याने किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. या मुलीला अल्पोर्ट सिंड्रोम हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार होतो.
जो किडनीवर परिणाम करत होताच; शिवाय श्रवणदोष होऊ शकतो. नऊ महिन्यांची असताना तिची श्रवणशक्ती कमी झाली होती. वयाच्या १८ महिन्यांत तिला कॉक्लियर इम्प्लांट करावे लागले. जेव्हा ती आठ वर्षांची झाली तेव्हा तिचे मूत्रपिंड निकामी झाले आणि वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
असे झाले उपचार
वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला तोवर ती डायलेसिसद्वारे उपचार घेत होती आणि सोबतच तिचे नाव किडनी प्रत्यारोपणासाठी कॅडेव्हर यादीत नोंदवण्यात आले होते. अनेक महिने प्रतीक्षा यादीत राहिल्यानंतर तिला अखेरीस एका ब्रेनडेड मुलाची किडनी उपलब्ध झाली.
एका १२ वर्षीय मुलाचा गंभीर अपघातात मेंदूला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. कुटुंबीयांना डॉक्टरांनी मुलाचे अवयवदान करण्याची परवानगी मागितली. त्यानुसार कुटुंबीयांनी या मुलाची किडनी दान केली. या मुलाच्या किडनीदानामुळे १३ वर्षांच्या मुलीला नव्याने आयुष्य मिळाले आहे.
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन रुग्णालयातील बालरोग मूत्रविज्ञान विभागाच्या प्रमुख आणि प्रा. डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले की, ‘प्रत्यारोपणासाठी सर्जिकल आणि वैद्यकीय पथकाकडून प्रयत्नांची आवश्यकता होती. या प्रकरणात, आमच्या संपूर्ण टीमने अहोरात्र अथक परिश्रम करून ही जीवरक्षक शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. या शस्त्रक्रियेसाठी अनेक तास लागले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाच्या तज्ज्ञ आयसीयू टीमने मुलीची बारकाईने काळजी घेतली.’
वाडिया रुग्णालयातील ही पहिली कॅडेव्हरिक रेनल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. ब्रेनडेड मुलाच्या अवयवदानामुळे एका मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मुलाला अपघातात गमावल्यानंतरही त्याचे अवयवदान करून इतर मुलांचे प्राण वाचवल्याबद्दल आम्ही मुलाच्या पालकांचे आभार मानू इच्छितो.
- डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रुग्णालय