मलिक यांच्या जामिनाबाबत आता उच्च न्यायालयात सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिक यांच्या जामिनाबाबत आता उच्च न्यायालयात सुनावणी
मलिक यांच्या जामिनाबाबत आता उच्च न्यायालयात सुनावणी

मलिक यांच्या जामिनाबाबत आता उच्च न्यायालयात सुनावणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गेल्या वर्षभरापासून मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मलिक यांच्या जामीन अर्जावर आता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कुर्ला येथील सुमारे तीस वर्षांपूर्वीच्या जमीन खरेदी प्रकरणात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या हस्तकांमार्फत मलिक यांनी व्यवहार केला, असा आरोप ‘ईडी’ने ठेवला आहे. या प्रकरणातील मूळ मालकिणीने मलिक आणि अन्य काही जणांविरोधात तक्रार केली आहे. ‘ईडी’ने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. सध्या मूत्रपिंडाच्या आजारामुळे ते कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचे एक मूत्रपिंड निकामी झाले असून लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे, असे जामीन अर्जात म्हटले आहे.

मंगळवारी न्या. संजीव खन्ना आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला आणि जुलैमध्ये सुनावणी निश्चित केली. मात्र यादरम्यान उच्च न्यायालयाने जामिनावर सुनावणी घ्यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन नामंजूर केला आहे. राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत, असा बचाव मलिक यांनी केला आहे.

कपिल सिब्बल यांनी मांडली बाजू
उच्च न्यायालयात यापूर्वी मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. कार्यबाहुल्यामुळे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उपलब्ध होऊ शकत नाही आणि सुनावणी जूनमध्ये आहे; पण मलिक यांची प्रकृती गंभीर आहे, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले. मलिक यांच्या वतीने सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.