
पुण्यातील २५ भटकी कुत्री पुन्हा मूळ ठिकाणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पुणे महापालिका क्षेत्रातील सुमारे ५० भटक्या कुत्र्यांपैकी २५ कुत्र्यांना मूळ ठिकाणी पुन्हा सोडण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला त्याबाबत आदेश दिले होते.
पुण्यातील प्राणीप्रेमी नागरिकाने उच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांसाठी याचिका केली होती. वडगाव शेरी परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याने काही दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने त्या परिसरातून ५४ भटके कुत्रे पकडले होते. त्यातील २५ कुत्र्यांना वडगाव शेरी परिसरात सोडण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने महापालिका आणि पोलिस विभागाला संबंधित कुत्रे पुन्हा आहे त्या ठिकाणी सोडण्याचे आदेश दिले होते. कुत्रे चावण्याचे प्रकार वाढल्याने परिसरात त्यांची दहशत निर्माण झाली आहे, अशा तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तीन भागांतील कुत्र्यांना पकडण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने दोन महिने राबविण्यात आली.
सोडण्यात आलेल्या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्यात आले आहे. उर्वरित कुत्र्यांबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.