नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त ‘युवा संवाद’ कार्यक्रम

नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त ‘युवा संवाद’ कार्यक्रम

मुंबई, ता. १६ ः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे १७ व १८ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने ‘युवा संवाद’ कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात होईल. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात येईल. त्याचप्रमाणे विविध स्टार्टअप तसेच व्यवसाय मार्गदर्शन विषयातील स्टॉल, शैक्षणिक कर्ज पुरविणाऱ्या बँकांचे स्टॉल, पुस्तकांचे आणि व्यवसाय मार्गदर्शन विषयावरील प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहतील. अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.
दोन दिवसांच्या मुंबई-पुणे दौऱ्यादरम्यान नड्डा यांचे अनेक कार्यक्रम असून ते पक्ष कार्यकर्त्यांच्या संमेलनातही मार्गदर्शन करतील. पहिल्या दिवशी सायन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला तसेच घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर घाटकोपर येथील लाभार्थी संमेलनातही ते सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यावर ते ‘युवा संवाद’ कार्यक्रमात सहभागी होतील. सावरकर सदनाला भेट दिल्यानंतर दुपारी दोन वाजता ते पुण्याला रवाना होतील. तेथे बालगंधर्व रंगमंदिर, पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील कार्यक्रमांनंतर ते रात्री नवी दिल्लीला रवाना होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com