
जनजागृतीसाठी पर्यावरण दिन साजरा करा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : देशातील सर्व विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जागतिक हवामान बदल, पर्यावरण बचाव मोहीम आदी कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस ‘पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा करावा, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत. जगभरामध्ये हवामान बदल आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा केला जावा, यासाठी यूजीसीने कार्यक्रमही जाहीर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानुसार ५ जून रोजी राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये पर्यावरण संरक्षण चळवळ राबवली जावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शाश्वत पद्धती आणि मिशन लाईफ आणि लाईफ कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी जागरुकता कार्यशाळा आयोजित करावी, सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपला सहभाग नोंदवावा, पर्यावरण वाचविण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत कागदाचा वापर टाळण्यासाठी कमी कागद किंवा डिजिटल कॅम्पस तयार करावेत, विद्यापीठ, महाविद्यालय आदी संकुल परिसरातील वसतिगृहे आणि कॅफेटेरियामध्ये अन्नाची नासाडी टाळण्यासाठी मार्गदर्शन सूचना द्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
संकुल परिसरात अथवा जवळच्या परिसरात वाळलेली पाने, कचरा, टाकून देण्यात आले अन्न यांचा वापर करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करावे, कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्टिंग केंद्राच्या स्थापनेस पुढाकार घ्यावा, पर्यावरण आणि हवामान बदलामुळे बिघडत असलेल्या निसर्गचक्राची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी सायकल रॅली आयोजित करावी, परिसरातील प्लास्टिक संकलन करून परिसर स्वच्छता उपक्रम राबवावेत, आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, प्राचार्य, संबंधित अधिकारी यांनीही आपला सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे यूजीसीने म्हटले आहे.