रात्रशाळांमधील अर्धवेळ शिक्षक संकटात!

रात्रशाळांमधील अर्धवेळ शिक्षक संकटात!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : राज्यातील अनुदानित शाळांमध्ये पूर्णवेळ नोकरीवर असलेल्या शिक्षकांना रात्रशाळांमध्ये दुबार शिक्षक म्हणून नियुक्त केले जात आहे. त्यामुळे रात्रशाळांमध्ये कार्यरत असलेल्या अर्धवेळ शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागण्याची भीती असल्याने सरकारने दुबार नोकऱ्या देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. या मागणीसाठी रात्रशाळेतील अर्धवेळ शिक्षकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.

रात्रशाळांमध्ये दुबार शिक्षकांच्या नेमणुकीचा निर्णय केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून वावरणाऱ्या एका शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लाभ करून देणारा आहे; मात्र ज्या शिक्षकांकडे केवळ एकच आणि तेही अर्धवेळ नोकरी होती, ती नोकरी हिरावणारा निर्णय आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे वेतन घेणाऱ्या शिक्षकांना दुबार नोकऱ्या देऊन बेरोजगार आणि नोकरीचा शोध घेणाऱ्यांवरही अन्याय होत असल्याने शालेय शिक्षण विभागाने काढलेला २५ एप्रिल रोजीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक सेल, शिक्षक परिषद, भाजप शिक्षक आघाडी आदी संघटनांकडून केली जात आहे.

पूर्णवेळ शिक्षकांची आवश्यकता
रात्रशाळा या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी संजीवनी देणाऱ्या ठरत आहेत. रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सर्वस्वी येथील शिक्षकांवर अवलंबून आहे. हे विद्यार्थी खासगी क्लासेस व शिकवणीला जात नाहीत. त्यामुळे रात्रशाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी येथे पूर्णवेळ शिक्षकांची आवश्यकता असल्याचे आंदोलनकर्त्या शिक्षकांचे म्हणणे आहे. रात्रशाळेतील रिक्त पदांवर दिवसाच्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांची नेमणूक केल्यास विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील, असेही या शिक्षकांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com