
आरटीई प्रवेश नाकारण्यात वाढ?
मुंबई, ता. १८ : मुंबई आणि परिसरातील खासगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आरटीई प्रवेश नाकारण्याचा प्रकार जोरात सुरू असल्याची तक्रार पालकांकडून होत असून यामुळे त्यांची तारांबळ उडाली आहे. आम्हाला मागील काही वर्षातील आरटीई प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे अगोदर आपण सर्व शुल्क भरा, त्यानंतरच आम्ही आपल्याला प्रवेश देऊ; अशी भूमिका काही शाळांनी घेतल्याने अनेक आरटीई प्रवेश अडचणीत सापडले असल्याची माहिती अनुदानित शिक्षण बचाव समितीचे प्रमुख के. नारायण यांनी दिली आहे.
अंधेरी, साकीनाका, मालाड, कांदिवली, आदी ठिकाणच्या खासगी शाळांमध्ये पालकांना प्रवेश नाकारले जात असून त्यासाठी पालक शिक्षण विभागाकडे तक्रार करत आहेत. मात्र त्यांना अजून दाद मिळाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात २२ मेपर्यंत हे प्रवेश होणार असल्याने तोपर्यंत किती शाळा प्रवेश नाकारतील, याची माहिती आम्ही जमवत असल्याचे नारायण यांनी सांगितले.
मुंबई आणि परिसरात आरटीई प्रवेशासाठी पात्र असलेल्या २७२ शाळा असून त्यामध्ये ६ हजार ५६९ जागा उपलब्ध आहेत. या जागांपैकी अद्यापही अर्ध्याहून अधिक जागांवर प्रवेश होणे बाकी असल्याची माहितीही देण्यात आली आहे.