पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणार

पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : पर्यावरणपूरक उत्सव आता काळाची गरज आहे. नागरिकांमध्येही त्यासंदर्भात मोठी जागृती होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची घोषणा केली आहे. आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई आणि कोकणातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेश मंडळांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
जलसंपदा, ग्रामविकास, पर्यावरण, नगरविकास, विधी व न्याय इत्यादी विभागांचे प्रधान सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव समितीत असतील. त्याशिवाय आयआयटी मुंबई, निरीचे प्रतिनिधी व डॉ. शरद काळे, डॉ. अजय देशपांडे यांना तांत्रिक तज्ज्ञ म्हणून समितीत घेण्यात येईल. संबंधित समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनास सादर करील. कृत्रिम तलाव वाढावेत, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जास्तीत जास्त स्पर्धा घ्याव्यात आणि चांगली पारितोषिके द्यावीत, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

उत्साह हवा; पण निसर्गाची तोडफोड नको!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत राष्ट्रीय हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. कृत्रिम तलावात घरगुती गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पर्यावरणाचा समतोल ठेवला गेला पाहिजे. सण आणि उत्सव साजरे करायचे; पण निसर्गाची तोडफोड नको, असे तत्त्व आपण ठेवले पाहिजे.
........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com